मुंबई : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. वीकेंडच्या रात्री लोक सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे आणि आरास पाहण्यासाठी निघतात. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर रात्रभर रेलचेल असते. याचदरम्यान, मुंबईतील कोस्टल रोडवरून एक वाईट बातमी आली आहे. रविवारी सकाळी मुंबई कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणार्या ०१ ६३०२ नंबर असलेल्या कारचा अपघात झाला. हा अपघात पहाटे ५:२०च्या सुमारास लोटस जेट्टीजवळ घडला. यात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार, अतिवेग हे अपघाताचे कारण असल्याचे दिसून येते. अपघातानंतर कारच्या चालकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
कोण होते हे चार जण?
मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जात असताना लोटस जेट्टीजवळ कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणार्या बीएमडब्ल्यू कारचा अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला. नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी असलेल्या तरूणाचे इसमाचे नाव आदित्य कल्पेश्वर ओसवाल (२३) आहे. तर धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकासनीया (१९) आणि शनय गज्जर (२१) या तिघांचा मृत्यू झाला आहे. आदित्य ओसवाल पुरुष ट्रॉमा वॉर्डमध्ये गंभीर अवस्थेत आहे.